संशोधनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील 15 तालुके आणि 60 गावांना भेट देऊन 961 स्त्रियांशी संवाद साधतांना लेखिकेला जाणवले की आर्थिक सक्षमीकरण हाच स्त्री सक्षमीकरणाचा पाया आहे. आर्थिक स्वावलंबन असेल तर स्वाभिमानाने जगता येते. ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात, स्वप्नांची पूर्तता करतांना कुटुंबाचा पाठिंबा असला तर जगण्याचा उत्सव होतो. दुर्दैवाने हे काहीही लाभले नाही तरी केवळ प्रबळ इच्छाशक्ती सुद्धा स्त्री च्या जगण्याला नवे परिमाण देते. सुखी जीवन जगण्यासाठी फक्त पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही तर आवश्यक आहेत सकारात्मक विचार, सुखाची नवी व्याख्या करण्याची जिद्द आणि आलेल्या संकटांनी न डगमगता त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊन स्वतःची बलस्थाने ओळखणे, स्वतःच्या सामथ्र्यावर विश्वास ठेवणे आणि आपल्या आयुष्याचे नेमके ध्येय ठरविणे. आजही भारतीय स्त्री सामाजिक दबावामुळे आपली माहिती सांगायला सहजासहजी तयार होत नाही. आपण दिलेल्या माहितीचा गैरवापर तर होणार नाही? आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा तर धोक्यात येणार नाही? आपण आपली संघर्ष कहाणी प्रकट केली तर भविष्यात नव्या समस्या तर निर्माण होणार नाहीत? असे अनेक प्रश्न तिला पडतात. तरीही, लेखिकेच्या हेतूबद्दल निःशंक झाल्यानंतर, नाव सांगणार नाही हे वचन दिल्यानंतर सगळ्याजणी बोलत्या झाल्या आणि लेखिकेसमोर त्यांनी खुली केली आपली भावमंजुषा! त्यातील निवडक प्रेरणादायी जीवनकथा या कथा संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. जगण्याला नवा अर्थ देणाऱ्या या कथा खऱ्या अर्थाने अर्थकथा आहेत. या सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या असामान्य स्त्रिया आहेत कारण त्यांना त्यांच्या स्व-रूपाची ओळख पटली आहे आणि आपल्या विजिगीषु वृत्तीने या वीरांगना आपल्या जीवन संघर्षात विजयी ठरल्या आहेत. तथाकथित यशाच्या चैकटीत या जीवनकथा कदाचित बसणार नाहीत परंतु नैराश्याने अंधारलेल्या मनांना आशेचा प्रकाश नक्कीच देतील याची खात्री वाटते.
ISBN | |
---|---|
Edition | First |
Year of publication | 2022 |
Pages | 76 |
Weight | 236 (in Grams) |
Library Dollar Price | 39 |
Type | |
Author |
Ashlesha Anil Kulkarni |
Publisher |
Himalaya pub |