राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तक राजकीय सिद्धांत सादर करीत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए. सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रकाशित करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे.
सामाजिक शास्त्राची एक महत्वपूर्ण ज्ञानशाखा म्हणून आपण राज्यशास्त्राचा उल्लेख करीत असतो. कोणतेही शास्त्र अवगत करण्याकरिता त्याच्याशी निगडीत विविध सिद्धांतांचे आकलन करणे आवश्यक असते. त्याशिवाय त्या शास्त्रात पारंगतता प्राप्त होत नाही. राज्यशास्त्र अवगत करण्याची पहिली पायरी म्हणजे राजकीय सिद्धांत होय. कोणताही सिद्धांत हा संकल्पनेवर आधारलेला असतो. एकाच संकल्पनेबाबत अनेक सिद्धांत निर्माण होवू शकतात. त्यामुळेच संकल्पना म्हणजे काय? आणि सिद्धांत म्हणजे काय? हे समजून घेण्याबरोबरच समकालीन विचारप्रवाह अभ्यासणे या दृष्टिकोनातुन प्रस्तुत पुस्तक हे विध्यार्थी वर्गाला निश्चितच सहकार्य करेल.
राजकीय सिद्धांत या पुस्तकात चार भाग असून प्रत्येक भागात दोन संकल्पनांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिल्या भागात राजकीय सिद्धांताचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व विशद करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या भागात अनुक्रमे सत्ता आणि अधिसत्ता, स्वातंत्र्य आणि समता, अधिकार आणि न्याय अशा सर्वच संकल्पनांचा विचार समकालीन औचित्य लक्षात घेऊनच स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
अभ्यासक्रम –
१. राजकीय सिद्धांत आणि राज्य
२. सत्ता आणि अधिसत्ता
३. स्वातंत्र्य आणि समता
४. अधिकार आणि न्याय